उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनपासून काही अंतरावर असलेल्या टिळेकरवाडी (ता. हवेली) गावाला इस्त्राईल येथील ‘(लिक्विड वॉटर सॉलिबल) हायफा इम्पोर्टेड’या कंपनीच्या पथकाने डाळिंब पिकाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने भेट दिली. तसेच गावातील शेतीचा, रोजगार, भौगोलिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, आरोग्याची माहिती घेतली.
इजराइल येथील हायफा इम्पोर्टेड कंपनीचे प्रमुख व भारतातील महाधन वॉटर सोल्युबल फर्टीलायझर कंपनी मार्फत कंपनीचे पथक व इजराइल देशामधील टीम यांनी संयुक्तपणे टिळेकरवाडी मध्ये डाळिंब शेतावरती भेट दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी गणेश टिळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. संतोष बापू टिळेकर, बाळासाहेब टिळेकर, अमोल टिळेकर, किरण झगडे, कालिदास झगडे व बरेच शेतकरी उपस्थित होते. टिळेकरवाडीच्या ग्रामस्थांनी केलेल्या पाहुणचाराने परदेशी पाहुणे भारावून गेले.
इस्राईलमध्ये डाळिंब हे प्रमुख व्यापारी पीक असल्याने अतिशय कमी पाणी आणि वाळवंट युक्त मातीमध्ये त्याचे अत्यंत चांगले उत्पादन येथील शेतकरी घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. ताजे डाळिंब खाण्याव्यतिरिक्त सलाड, काही रेसिपीज, ज्यूस, आरोग्यदायी उत्पादने, सौंदर्यप्रसाधने आणि औद्योगिक उत्पादनांसाठी कच्चा माल, रंग आदी उद्देशांनी येथे डाळिंबावर संशोधन सुरू आहे.
देशात डाळिंबाची सुमारे अडीच हजार हेक्टरवर लागवड आहे. प्रामुख्याने अवशेषमुक्त पद्धतीने उत्पादन घेतले जाते. सुमारे 19 टक्के फळबागा वंडरफूल वाणाखाली आहेत. तर 116, कॅमेल, अक्को, शानी, इमेक, रोष पेरेड आदी जातींखालीही काही क्षेत्र आहे. लवकर येणारे वाण, मध्य- हंगामी व मुख्य पीक हंगाम असे टप्पे आहेत. दरवर्षी सुमारे 65 हजार टन डाळिंबाचे उत्पादन होते. त्यापैकी 38 टक्के डाळिंबाची परदेशात निर्यात होते.
दरम्यान, युरोपीय देश, रशिया, युक्रेन आणि उर्वरित कॅनडा, जॉर्डन, हाँगकाँग, श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे. सहकारी पद्धतीने शेती करतात. पाण्याचा ठिबक सिंचनाद्वारे योग्य वापर याविषयीचे नियोजन सांगितले. फळावर सूर्यकिरणाचा प्रादुर्भाव होऊन काळा चट्टा पडतो. यावर उपाय म्हणून झाडाची वरची कॅनॉपी वाढवून फळे त्याखाली वाढविण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल त्यांनी विवरण केले.