चिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील खडसंगीजवळच्या मजरा वेगडे येथील वामन राणे (४६) व मुलगा समीर राणे (१९) हे बापलेक बुधवारी सकाळी शेताकडे गेले होते. सायंकाळी जवळपास ४ वाजताच्या दरम्यान बैलजोडी घेऊन घराकडे परतताना बंधाऱ्याजवळील नाल्यात बैल जात असल्याचे दिसताच बापलेक बंधाऱ्याजवळील नाल्याजवळ गेले. मात्र, एक बैल बंधाऱ्यातील नाल्यात शिरला, तर दुसरा बैल बाहेर होता. त्यांचे एकमेकाला बांधून असलेले कासरे सोडत असताना अचानक समीरचा पाय घसरल्याने तो नाल्यात पडला. याचवेळी बैलाने ओढत नेल्याने समीर नाल्यात वाहत गेला. तर वडील वामन राणे हे सुध्दा बंधाऱ्याजवळील नाल्यात पडले. पण कसेबसे त्यांनी स्वतःला सावरल्याने त्यांचा जीव वाचला.
सदर घटनेनंतर बैलाचा व मुलाचा शोध घेतला असता बैलजोडी घटनास्थळावरून जवळपास २ किमी अंतरावर आढळली. पण दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. मात्र, समीरचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. याबाबत चिमूर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलिसांचे पथक करीत आहे. रात्रीदरम्यान, शेडेगाव परिसरातही पोलीस पथकाकडून शोध घेण्यात आल्याची माहिती आहे.