पुणे : पंतप्रधान आवास योजनेत घरकुल मिळण्यासाठी दीड लाख रुपये मंजूर झाले होते. त्या दीड लाख रुपयांचा हप्ता देण्यासाठी एका व्यक्तीस 50 हजार रुपयांची लाच मागितली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 50 हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगर विकास प्राधिकरणातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अभियंत्यांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई सासवड परिसरात करण्यात आली आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे, तेजस संपत तावरे (वय 32, कनिष्ठ अभियंता), हेमंत लालासाहेब वांढेकर (वय 29, इंजिनिअर), रामदास उर्फ बाबू मारुती कटके (वय 48, रा. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्ज केला होता. त्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता एक लाख रुपये तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. बाकीचे दीड लाख रुपये जमा करण्याचे आमच्या हातात आहे. ती रक्कम तक्रारदार यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) कंत्राटी पद्धतीने काम करणारे हेमंत वांढेकर आणि रामदास कटके यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी धाव घेतली. तेव्हा त्यांच्या तक्रारीची पडताळणी करते वेळीस हेमंत वांढेकर, रामदास कटके आणि तेजस तावरे यांनी पीएमआरडी कार्यालयात आमची ओळख आहे असे सांगितले. याप्रकरणी पोलीसांनी सासवड बसस्टॅंडसमोर असलेल्या सिद्धेश्वर हॉटेल येथे बुधवारी (दि.07 ऑगस्ट) रोजी सापळा रचून त्या आरोपींना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.