पिंपरी : नार्कोटिक्स विभागातून बोलत असून तुमच्या नावाने मुंबई येथून इराणमध्ये जाणाऱ्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, अशी भीती दाखवून महिलेची २४ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शिताफीने तपास करत पिंपरी चिंचवड सायबर सेलच्या पथकाने चौघांना अहमदनगर, जळगाव आणि सुरत येथून बेड्या ठोकल्या. स्वरूप अशोक खांबेकर (वय ४२, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), पुष्कर चंद्रकांत पाखले (रा. जळगाव), मोनीक भरतभाई रंगोलीया (रा. सुरत), कौशिक मनसुखभाई बोरड (रा. सुरत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बाणेर येथील ३८ वर्षीय महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाइल क्रमांक धारकाने फिर्यादी महिलेला फोन केला. तो फेडेक्स कुरीअर कंपनी, मुंबई अंधेरी येथून कंपनीचा हेड रिप्रेझेन्टीव्ह बोलत असल्याचे त्याने भासवले. त्यानंतर स्काइप अॅपच्या माध्यमातून फिर्यादी महिलेच्या मोबाइलच्या स्क्रिनचा अॅक्सेस मिळवला. महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून २४ लाख ९९ हजार ९९८ रुपये बँक खात्यावर घेतले. याबाबत हिंजवडीसह पिंपरी चिंचवड सायबर सेलकडून समांतर तपास केला जात होता.
सायबर पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्याची माहिती मिळवली. त्याद्वारे आरोपीची ओळख पटवून त्याला अहमदनगर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करत त्याच्या इतर तीन साथीदारांची माहिती घेऊन त्यांनाही जळगाव आणि सुरत येथून ताब्यात घेतले. आरोपींनी वापरलेल्या एसबीआय बँकेच्या खात्यावर दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत. त्या खात्याबाबत भारतातून ६८ तक्रारी आलेल्या असून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.