राहुलकुमार अवचट
यवत : मागील चार महिन्यापूर्वी भांडगाव (ता. दौंड) येथील ”वेस्टन मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीत विषारी वायुमुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच, आता टेस्टी बाईट कंपनीतसुद्धा विषारी वायूगळती झाल्याचा प्रकार आज बुधवारी (ता.७) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. या घटनेत १७ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे. या घटनेने पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भांडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत टेस्टी बाईट रेडी टू इट – रेडी टू कुक ही खाद्यपदार्थाची कंपनी आहे. या कंपनीत महिला व पुरुष असे दोघेही काम करतात. आज बुधवारी (ता.७) सकाळी कामगार काम करीत असताना कंपनीत अचानक फ्रोझन फुड प्रोडक्शन युनिट मध्ये फ्रिजसाठी वापरण्यात येणारे अमोनिया गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने विषारी वायूगळती झाली. यामध्ये कंपनीत काम करणाऱ्या १५ महिला व २ पुरुष अशा १७ कामगारांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर कामगारांना भांडगाव येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
या घटनेत अलका संभाजी डमरे, दैवशाला मोहन शिंदे (दोघीही रा. भांडगाव) व सपना सतीश शितोळे (रा. पडवी) या तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर २ पुरुष आणि १२ महिला अशा १४ कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर भांडगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, भांडगाव परिसरातील कंपन्यांमध्ये विषारी वायू गळतीच्या व आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमध्ये कामगार जखमी होत आहेत. कंपनीने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत का? कंपनी कामगारांच्या जीवाशी खेळत आहे का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.