नागपूर : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता नागपूर जिल्ह्यातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे तरुणीला व्हिडिओ कॉल करत तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पलाश सोनारे (वय- 22) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पलाशचे एका तरुणीवर प्रेम होते आणि त्याला त्या तरुणीसोबत लग्न करायचे होते. संबंधित तरुणी मात्र लग्नासाठी सतत नकार देत होती. या कारणामुळे पलाश अनेक दिवसांपासून तणावात होता. त्याच दरम्यान घटनेच्या दिवशी पलाशचे तरुणीसोबत भांडण झाले होते. यानंतर त्याने तरुणीला फोन करून चॅटिंग सुरू केले. मात्र, तरुणीला त्याच्याशी बोलायचे नव्हते.
पलाशने तिला व्हिडीओ कॉल करून गळफास घेत असल्याचे सांगितले. यानंतर पलाशचा लहान भाऊ खोलीतून बाहेर आला. त्याने पलाशला हाक मारण्यास सुरुवात केली. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता पलाश दिसत नसल्याचे दिसले. दरम्यान, त्यानंतर त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडून पलाश पंख्याला लटकताना दिसला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
पोलिसांनी पलाशचा मोबाईल जप्त केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहे. दरम्यान, पलाशच्या कुटुंबात आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे. पलाश हा व्यवसायाने फोटोग्राफर होता.