मुंबई : औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव असं करण्यात आलं आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हि मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मागच्या सरकारचे काही निर्णय अधिकृतपणे घेण्यात आले. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ‘सह्याद्री’वर झालेल्या बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयांची मागिती देण्यात आली आहे.
याशिवाय मुंबई आणि उपनगर भागामध्ये MMRDA त्या विविध प्रकल्पांसाठी ६० हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींसाठी शासनाने हमी देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान, मंत्रीमंडळाने घेतलेले निर्णय हे उगवत्या सूर्याच्या साक्षीने घेतल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “आज मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकणारे निर्णय नाहीत. उगवत्या सूर्याच्या साक्षीने सरकारने जबाबदारी स्वीकारून घेतलेले निर्णय आहेत. या निर्णयांचा नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.