पुणे : पुण्यात झालेल्या जोरदार पावसानंतर सोमवारी (दि. ५) पावसाचा जोर ओसरला. सायंकाळपर्यंत शहरात केवळ ०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील काही दिवस शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर, घाट विभागात यलो अलर्ट असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहरात रविवारी (दि. ४) पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दिवसभरात ५३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर, सोमवारी काही भागात तुरळक सरी पडल्या. तसेच उन्हाचेही दर्शन झाले. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत झाल्याचे दिसून आले.
सोमवारी सायंकाळपर्यंत एनडीए येथे १ मि.मी., वडगावशेरी ०.५ तर पाषाण येथे ०.४ मि.मी. इतक्या हलक्या पावसाची नोंद झाली. तर, जिल्ह्यातही पावसाने उघडीप दिली असून लवासा येथे १७ मि.मी., लोणावळा १४.५, खेड १.५, माळीण १, तळेगाव ०.५, दौड येथे ०.५ मि.मी. पाऊस पडला. येत्या ६ ते ११ ऑगस्टदरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी तर घाट विभागात जोरदार पाऊस पडणार आहे. शहरात कमाल तापमान २७.८ तर किमान तापमान २२.९ अंश सेल्सिअस होते.