पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांना सलग दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. विशेषत: पुणे आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यातील भिडे पूल सलग चौथ्या दिवशी पाण्याखाली गेला, तर नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी राज्यातील विविध भागात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्यामुळे या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळं उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. यामुळं पंढरपुरात पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.