संतोष पवार
पळसदेव : एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंर्तगत राज्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण, आदिवासी, नागरी प्रकल्पातील कार्यरत एकूण १४ हजार ६९० अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली. अंगणवाडी मदतनीसांची पदे भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मदतनीसांच्या पद भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण, आदिवासी, नागरीकडून स्थानिक स्तरावर जाहिराती दिल्या गेल्या आहेत. या जाहिरातीनुसार मदतनीस पदासांठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असलेल्या १८ ते ३५ वर्षे वयोगटातील व विधवा उमेदवारांच्या बाबतीत कमाल ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये विहित केलेल्या मुदतीत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयांत अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयुक्त पगारे यांनी केले आहे. शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनिसांची पदे रिक्त आहेत.
त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनिसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.