सासवड : श्री संत शिरोमणी सावता महाराज पालखी सोहळा हा गेली सात वर्षापासून ह.भ.प दिलीप महाराज झगडे, ह.भ.प दत्तात्रेय महाराज फरांदे, ह.भ.प बाळासाहेब बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केला आहे. सासवड येथील श्री क्षेत्र सोपान काका मंदिरातून ५ ऑगस्ट रोजी प्रस्थान होणार आहे. तर श्री क्षेत्र अरण भेंडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे १४ ऑगस्ट रोजी पोहोचणार असल्याचे सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प श्री दिलीप महाराज झगडे यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथे दिनांक ५ ऑगस्ट रोजी श्री संत सोपान काका महाराज मंदिरामध्ये दुपारी ११ वाजता सावता महाराज पादुका पुजण, श्री संत सोपान काका महाराज भेट, अभिषेक, प्रस्थान, सासवड नगर प्रदक्षिणा, व फराळ पंगत सासवड मंडळ यांच्या वतीने, तर दुपारचा विसावा यमाई शिवरी, रात्री मुक्काम सावता महाराज मंदिर दवणेमळा जेजुरी येथे होईल.
दरम्यान, श्री संत सावता महाराज पालखी सोहळ्यासाठी लागणारा रथ लोकवर्गणीतून बनवण्यात आला असून या रथाचे लोकार्पण सोहळाही यावेळी होणार असल्याची माहिती सोळा व्यवस्थापक राजाभाऊ अडसूळ यांनी दिली.
श्री संत सावता महाराज मंदिरात काल्याचे किर्तन १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ. प दिलीप महाराज झगडे, तर महाप्रसाद ग्रामस्थ मंडळ वाल्हे पंचक्रोशी यांच्या वतीने होईल. तसेच रात्री मुक्काम श्री संत सावता महाराज मंदिर अरण या ठिकाणी होणार असल्याची माहिती संस्थापक सचिव ह.भ. प महावीर भुजबळ यांनी दिली.