अहमदनगर : जगण्याची कसलीच शाश्वती राहिली नाही अशीच एक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. खेळता खेळता अंगातील पाण्याच्या हौदात पडून एका 4 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी (4 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली. समर शेख असं मृत मुलाचे नाव असून ही थरारक घटना थरारक सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात शेख कुटुंबीय राहत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा 4 वर्षीय मुलगा समर शेख हा अंगणात खेळत होता. खेळता खेळता तो पाण्याचा हौदाजवळ गेला. हौदावर झाकण ठेवण्यात आले होते. याच झाकणावर समर शेख हा उभा राहिला. मात्र, झाकण कुचकामी असल्याने समर हा हौदात पडला. हौदात पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ उलटून गेला तरी समर हा कुठे दिसत नसल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरु केली.
तब्बल 5 तास शोधाशोध करूनही समर कुठेही दिसून आला नाही. यावेळी एका व्यक्तीने हौदात डोकावून बघितले असता, समरचा मृतदेह हौदाच्या पाण्यात तरंगताना दिसून आला. डोळ्यादेखत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने समरच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. समरचा मृतदेह हौदातून बाहेर काढण्यात आला. हौदाचे झाकण न बसविणाऱ्या संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी समरच्या कुटुंबियांनी केली आहे.