जळगाव : पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या आतेभावाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. ३) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
मोहम्मद एजाज नियाज मोहम्मद मोमीन (वय-१२), मोहम्मद हसन नियाज मोहम्मद मोमीन (वय-१६, दोघे रा. बडा मोहल्ला, पारोळा) आणि आवेश रजा मोहम्मद जैनुद्दीन (वय-१४, रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील एजाज आणि हसन हे दोघे सख्खे भाऊ तर आवेश हा त्याचा आतेभाऊ होता. आवेश दोन दिवसांपूर्वीच नाशकातील मालेगावहून पारोळा येथे आला होता.
नेमकं काय घडलं?
पारोळा शहरातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (वय-१६), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय-१४), आश्रम पीर मोहम्मद (वय-९), इब्राहिम शेख अमीर (वय-१४, सर्व रा. बडा मोहल्ला, पारोळा), आवेश रजा शेख मोहम्मद (वय-१७, रा. मालेगाव, जि. नाशिक), हे पाचही जण शनिवारी दुपारी शहरापासून चार किलोमीटरवरील भोकरबारी धरणाच्या काठावरील पीर बाबांच्या दर्शनासाठी गेले होते.
दर्शनानंतर त्यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज, इजाज रजा न्याज मोहम्मद व आवेश रजा शेख मोहम्मद हे तिघे धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. विशेष बाब म्हणजे पाचपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. मात्र, केवळ खेळण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ तिघेही बुडाले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी ओरडा ओरड केली. त्यांच्यासोबत असलेल्या अश्रफ पीर मोहम्मद आणि इब्राहिम शेख अमीर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यामध्ये यश आले नाही.
दोघांनी वंजारी गावाकडे धाव घेत ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तिघांचे मृतदेह पारोळा येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले.