पुणे : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या आणि निराधार महिला व मुलांसाठी सेवा कार्य उभ्या करणाऱ्या समाजसेविका शोभना रानडे (वय-99) यांचे वृद्धापकाळाने आज रविवारी निधन झाले.
शोभना रानडे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1924 रोजी पुण्यात झाला होता. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या भेटीने शोभना यांनी आयुष्यभर गांधीवादी आदर्श स्वीकारले. रानडे यांचे जीवन निराधार स्त्रिया आणि बालकांसाठी समर्पित होते.
शोभना रानडे या कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, गांधी स्मारक निधी, बालग्राम महाराष्ट्रच्या विश्वस्त, गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या सचिव, अखिल भारतीय महिला निरक्षरता निर्मूलन समिती, अखिल भारतीय महिला परिषद आणि भूदान ग्राम दान मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून त्यांचा गंगा वाचवा चळवळ , गंगा नदीला प्रदूषणापासून वाचवण्याच्या मोहिमांमध्येही सक्रीय सहभाग होता.
शोभना रानडे यांच्या व्यापक कार्याची दखल घेऊन विविध नामांकित संस्थांनी त्यांचा सन्मान केला. रानडे यांना जमनालाल बजाज पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, प्राईड ऑफ पुणे पुरस्कार, बाल कल्याण कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार महात्मा गांधी पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.