पुणे : कोरोना काळात महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बंद असलेली बायोमॅट्रिक्स हजेरी आता पुन्हा सुरु करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे याच्याकडून देण्यात आले आहेत.
पालिकेतील कर्मचारी किती वाजता कामावर हजर झाला, कामाचे तास पूर्ण झाले का अशी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने पालिका प्रशासनाने कामचुकार अधिकाऱ्यांना वेसण घालण्यासाठी बायोमॅट्रिक्स हजेरी पुन्हा सुरु केली आहे.
कोरोना काळात ही संगणकीय प्रणाली बंद करण्यात आली होती. मात्र कोरोना काळानंतर पालिकेचे कामकाज देखील पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहे. मात्र, अनेक अधिकारी कामकाजाच्या वेळा पाळत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
यापुर्वी थेट आयुक्तांनी आदेश देऊन देखील अनेक कर्मचारी वेळेत उपस्थित राहात नसत. कर्मचाऱयांनी दिलेल्या थंड प्रतिसादामुळेच अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांनी थेट वेतनावर बोट ठेवल्यामुळे किमान आता तरी कर्मचारी वेळा पाळतील, असे अपेक्षित आहे.
सध्या अनेक कर्मचारी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करत उपस्थितीची नोंद करत आहेत. मात्र, कधी कधी दोन – तीन दिवसांची एकदाच स्वाक्षरी करण्याचे प्रकार यापूर्वी देखील झाले आहेत. त्यामुळेच बिनवडे यांनी आदेश काढताना वेतनाच्या मुख्य मुद्द्याला हात घातला आहे.
संबंधित खाते प्रमुखांनी देखील आपल्या विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक नोंदणी झाली असल्याची तपासणी करून याची माहिती सामान्य प्रशासन विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जे अधिकारी, कर्मचारयांची बायोमेट्रिक प्रणालीत नोंद झालेली नाही त्यांचे १५ नोव्हेंबर पासून वेतन देऊ नये असे स्पष्ट आदेश काढण्यात आले आहेत.