सातारा : मोबाईल आता खूप गरजेची गोष्ट बनली आहे. प्रत्येक क्षण कैद करून ठेवण्याची तरुणाईला घाई झालेली दिसून येते. असाच एक क्षण आपणही कैद करावा म्हणून सेल्फी काढण्याचा नाद एका तरुणीला चांगलाच अंगलट आला आहे. पुण्यातील एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीत कोसळली. साताऱ्यातील बोरने घाटात हा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील वारजे येथील नसरीन अमीर कुरेशी (वय २९) काही जणांसोबत साताऱ्यातील संगमनगरमध्ये कारने आले होते. यांनी ठोसेघर येथे भटकंती केली. परंतु ठोसेघर धबधबा बंद होता. त्यामुळे बोरणे घाटात आल्यावर सर्वजण गाडीतून उतरुन फोटोसेशन करु लागले असताना नसरीन सेल्फी घ्यायला गेली आणि अचानक तिचा तोल गेला. त्यानंतर ती शंभर फूट खोल दरीत पडली. एका झाडावर ती अडकली त्यामुळे तिचा जीव वाचला.
घाटात मदतकार्य
नसरीन कुरेशीसोबत आलेल्या मुलांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलवले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने घाटात मदतकार्य सुरू केले. होमगार्ड अभिजित मांडवे दरीत उतरला. त्याने त्या तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्टने बांधून बाहेर काढले. या घटनेत नसरीन कुरेशी गंभीर जखमी झाली आहे. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.