भादा : औसा तालुक्यातील काळमाथा (जि.लातूर) येथे एका घरातील टीव्हीचा अचानक स्फोट झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या स्फोटात सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु शेतमजूर कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काळमाथा येथील दत्तू भाऊराव भोंग हे मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
गुरुवारी सायंकाळी त्यांच्या सहा सात वर्षांच्या मुलाने टीव्ही सुरु केला असता अचानक त्याचा स्फोट झाला. स्फोट होताच दत्तू कुटुंबासह बाहेर पळाले. स्फोट इतका मोठा होता की या घरातील कपाट, त्यातील कपडे, धान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तसेच भांडीही वितळून गेली होती. विजेचा प्रवाह टीव्हीमध्ये उतरल्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. सदरील घटनास्थळी तलाठी व पोलिसांनी पंचनामा केला.