केरळ : केरळामधील वायनाड सद्या चर्चेत आहे. ते तिथल्या निसर्गाचा रुद्रावतारामुळे. 4 गावं मातीखाली गेली. 300 हून अधिक लोकांचा बळी गेला असून अजूनही 300 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. त्यात आता एक थरारक घटना वायनाड मध्ये घडली आहे. मदत पथकातल्या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावत घनदाट जंगलात एका गुहेमध्ये आसरा घेतलेल्या चार अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. चार दिवसांपासून ही मुलं अन्नपाण्यावाचून गुहेत अडकून होती.
कालेपट्टा रेंजच्या जंगलात एक महिला या मुलांना अन्नपाणी मिळावं म्हणून भटकत असल्याचं वनअधिकाऱ्यांच्या नजरेला पडलं होती. तिची विचारपूस केल्यानंतर त्या महिलेनं जवानांना गुहेमधील आपली चार मुलं दाखवली. 1 ते 4 वर्षे वयाची ही मुलं आहेत. 8 तासांच्या विशेष मोहिमेनंतर ही आदिवासी मुलं आणि त्यांच्या आईला सुरक्षित स्थळी आणण्यात आलं आहे. या पाचही जणांची जगण्याची शक्यता धुसर असताना त्यांना वाचवून मदत कार्य करणाऱ्या जवानांनी आपल्या उच्च क्षमतांचा परिचय दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडच्या पानिया समुदायातील हे कुटुंब डोंगरमाथ्यावरील एका गुहेत अडकले होते. त्या गुहेच्यावर खोल दरी होती आणि तिथे पोहोचण्यासाठी टीमला साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. पीटीआयशी बोलताना, हशीस यांनी सांगितले की, गुरुवारी आई आणि चार वर्षांच्या मुलाला वनक्षेत्राजवळ भटकताना पाहिले. मायलेकरांची चौकशी केल्यावर कळाले की इतर तीन मुले आणि त्यांचे वडील अन्नाविना गुहेत अडकले आहेत.
हशीस पुढे सांगितले की, गुहेत अडकलेले हे कुटुंब आदिवासी समाजातील एका विशेष वर्गाशी संबंध ठेवतो. सहसा या समाजातील इतर लोकांशी संवाद टाळत असतात. ते सामान्यतः वनातील उत्पदनांवर अवलंबून असतात. शेतातील तांदूळ स्थानिक बाजारपेठेत विकून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र मुसळधार पाऊस आणि भूसख्लनामुळे बाहेर पडता न आल्याने अनेक दिवसापासून ते उपाशी होते.
गुहेजवळ काय दिसले?
हशीस म्हणाले कि, ज्यावेळी आम्ही मोठ्या अथक प्रयत्नांनतर गुहेजवळ पोहचलो त्यावेळी आम्ही पाहिले की मुले थकली होती. आम्ही आमच्याबरोबर जे काही अन्नपदार्थ घेतले होते ते आम्ही त्यांना दिले. नंतर खूप समजावून सांगितल्यावर, त्यांच्या वडिलांनी आमच्यासोबत यायला तयार केले. आम्ही मुलांना आमच्या अंगावर पट्टा बांधला आणि परतीचा प्रवास सुरू केला.
मुख्यमंत्र्यांकडून जवानांचे कौतुक..
अट्टमला येथील स्थानिक कार्यालयात मुलांना जेव्हा जवान मुलांसह पोहचले त्यावेळी मुलांना खायला दिले गेले आणि कपडे आणि बूट दिले गेले. सध्या त्यांना तिथे ठेवण्यात आले असून मुले सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोशल मीडियावर अधिकाऱ्यांच्या आव्हानात्मक प्रयत्नांचे फोटो शेअर करत त्यांचे कौतुक केले आहे.