पुणे : पश्चिम बंगालमधून आलेल्या व्यक्तीला निगडीतील हॉटेलमालकाने पोलिसांशी संगनमत करून मनोरूग्णालयात पाठविल्याचा दावा पश्चिम बंगालमधून रोजगारासाठी आलेल्या व्यक्तीने केला आहे. पश्चिम बंगालमधून पुण्यात आलेल्या मध्यमवयीन पुरुषाने सहा महिने हाॅटेलमध्ये कूकचे काम केल्यानंतर हाॅटेल मालकाकडे पगार मागितल्यामुळे त्याला मनोरुग्ण ठरवून येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठवल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप बिस्वास (वय ४३ रा. नादिया, पश्चिम बंगाल) असे या प्रकरणातील पीडित पुरुषाचे नाव असून तो पश्चिम बंगालमधून नोकरीसाठी पुण्यात आला होता. पुण्यात सेटल होण्याच्या उद्देशातून त्याने निगडी येथील एका हॉटेलमध्ये कूकची नोकरी पत्करली. मात्र, सहा महिने झाले तरी हॉटेल मालक पगार देत नसल्यामुळे दिलीप याचा संयम सुटला. त्याने मद्यमान करून पगारासाठी मालकासोबत भांडण केले.
याचा राग आल्याने मालकाने चक्क पोलिसांशी संगनमत करून दिलीपला मनोरुग्ण ठरवाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाॅटेल मालक इथेच थांबला नाही तर त्याने पोलिसांमार्फत दिलीपची रवानगी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात केली. मात्र, येथील एका समाजसेवा अधीक्षकाच्या सजगतेमुळे तो मनोरूग्ण नसल्याचे लक्षात आले. या समाजसेवा अधीक्षकाने दिलीपच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याला साडेतीन महिन्यानंतर त्याच्या मूळगावी परत पाठवले.
निगडी पोलिसांनी १९ एप्रिलला एक मध्यमवयीन पुरुषाला येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयात दाखल केले होते. समाजसेवा अधीक्षक मारुती दुणगे यांनी तरुणाबरोबर चर्चा केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. दिलीपला उत्तम स्वयंपाक करता येत असल्यामुळे त्याला निगडी येथील एका हॉटेलमध्ये कूक म्हणून नोकरी मिळाली. सहा महिने झाले तरी हॉटेलमालकाने त्याला पगार दिला नाही. वारंवार आर्जव-विनंती करूनही पगार मिळत नसल्याने बिस्वासचा संयम सुटला आणि त्याने मद्यपान करून मालकासोबत याच विषयावरून भांडण केले.
त्या प्रकारामुळे चिडलेल्या हॉटेलमालकाने निगडी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संगनमताने बिस्वासला मनोरूग्ण ठरविण्याचा प्लान केला. त्याला मद्याच्या अमलाखाली येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. मनोरूग्णालयातील नियमाप्रमाणे दिलीपला १५ दिवस निरीक्षणगृहात ठेवले. तेथे त्याच्यामध्ये मनोरूग्णाची कोणतीच लक्षणे नसल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाटील, वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप महामुनी आणि डॉ. अमित गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीपला समाजसेवा अधीक्षक मारुती दुणगे यांच्याकडे सोपवण्यात आले.
निगडी पोलिसांकडून आरोपांचे खंडण..
दिलीप विश्वास हा मनोरुग्ण नसताना सुद्धा त्याला मनोरुग्णालयात पाठवण्यात आल्याचे आरोप निगडी पोलिसांनी फेटाळून लावले. ‘‘संबंधित व्यक्ती नग्नावस्थेत रस्त्यावर फिरून महिलांना त्रास देत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यावरून घटनास्थळी जाऊन त्याला नग्नावस्थेत पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तो काम करीत असलेल्या हॉटेलच्या चालकाकडून संपर्क क्रमांक घेऊन आम्ही त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता.
त्यावेळी तो वेडसर वागत असल्याने त्याच्यावर मूळ राज्यात उपचार सुरू असल्याचे पत्र आणि उपचार सुरू असलेली कागदपत्रे नातेवाईकांनीच पाठवली होती. त्याचबरोबर प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाच्या आदेशानेच आम्ही त्याला येरवडा येथे दाखल केले. दिलीपचे कुटुंबीय येथे आल्यावर त्याचा ताबा त्यांना द्यायला हरकत नाही, असेदेखील येरवडा रुग्णालयाला कळविले होते. संबंधित व्यक्तीला सोडण्यास येरवडा मनोरुग्णालयाने एवढा वेळ का घेतला, याची आम्हाला कल्पना नाही,’’ असे निगडी पोलीस ठाण्याशी संबधित अधिकाऱ्याने सांगितले.
निगडी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने अज्ञात व्यक्तीला येरवडा मनोरूग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. यावेळी दिलीप बिस्वास याचे आधारकर्ड आणि पॅनकार्ड ही कागदपत्रे जोडली होती. त्या कागदपत्रांच्या आधारे दिलीपशी संवाद साधून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला. दिलीपचे वर्तन पाहता प्रथमदर्शनी तो मनोरुग्ण असल्याचे जाणवले नाही.
– मारुती दुणगे, समाजसेवा अधिक्षक, येरवडा मनोरुग्णालय