पुणे : पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ताम्हिणी घाटाजवळील आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचला आहे.
नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता आजपासून ५ ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. यामुळे ताम्हिणी घाटमार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद राहणार आहे
रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ रास्ता बंद करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.
मुळशी तालुक्यात गेली दोन आठवड्यांपासून अतिमुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पिरंगुट घाटामध्ये जागोजागी दरडी कोसळल्या आहेत. चांदणी चौकातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भुगाव, भुकुम, पिरंगुट, शिंदेवाडी या परिसरामध्ये महामार्गावर ठिकठिकाणी पाण्याची डबकी झाली आहेत.