पुणे: राज्यभरात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट, उष्णतेची लाट आणि वादळी वारा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यामधील द्रोणीय रेषा आता आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या केरळवरील चक्रीय स्थिती मराठवाडापर्यंत (कर्नाटकमधून) जात आहे. पश्चिम विदर्भ आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ०.९ किमी पर्यंत वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यात पावसाला अनुकूल वातावरण आहे.
येत्या १५ ते १७ मे दरम्यान, कोकण भागात पावसाचा यलो अलर्ट तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणाच्या काही भागात उष्णतेची लाट राहणार आहे. १५ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपिटीचा इशारा आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसही पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. मंगळवारी (दि. १४) सायंकाळपर्यंत सातारा येथे ७ मिमी, सोलापूर ४, धाराशीव २मि.मी, छत्रपती संभाजीनगर येथे २ मि.मी पावसाची नोंद झाली. तसेच इतर भागातही पाऊस सक्रिय आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.