पुणे: राज्यात कमाल तापमानात वाढ, तर किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका, तर रात्री थंडी असे वातावरण झाले आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांना यलो अलर्ट असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाश निरभ्र झाल्याने सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत आहे. त्यामुळे दुपारच्या तापमानात वाढ झाली आहे. तसेच सूर्याचे दक्षिणायन असल्यामुळे वायव्य भागातून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागले आहेत. त्यामुळे रात्रीचा गारठा जाणवत आहे.
मंगळवारी राज्यात सर्वांत कमी तापमान महाबळेश्वर येथे १५.४ अंश सेल्सिअस होते. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात थंडीची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, सोलापूर तसेच बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांत विजांसह पावसाचा यलो अलर्ट आहे. राज्याच्या काही भागात उन्हाचा चटका बसत आहे.