पुणे : राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, हिंगोली, परभणी, नांदेड, रायगड, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारताच्या उत्तर भागातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. राजस्थान, कच्छ या भागांत परतीचा पाऊस एका आठवड्यापूर्वीच सुरू झाला आहे. पण महाराष्ट्रात अद्यापही परतीच्या पावसाची चिन्हे नाहीत, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
आणखी एक आठवड्याच्या कालावधीनंतर महाराष्ट्रात परतीच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुढील तीन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज देताना ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे रब्बीच्या हंगामातील पिकांना चांगला फायदा होऊ शकतो. फक्त अवकाळी किंवा जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.