winter update: पुणे : राज्यात पुढील दहा ते पंधरा दिवस हवामान कोरडे असणार आहे. सुटीचे नियोजन आणि सहलीला जाण्यासाठी हा काळ उत्तम आहे. या काळात हिवाळ्याचा आनंद साजरा करता येणार आहे. कारण पुढील काही दिवस राज्यातील हवामान चांगले असणार आहे. राज्यात कुठेही हवामान बदलाची शक्यता नाही, असे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे.
गुलाबी थंडीत पर्यटन
पुढील काही दिवस राज्यातील कमाल तापमान सामान्यापेक्षा कमी असणार आहे. चार ते पाच दिवस रात्री थंडी असणार आहे. यामुळे आता नाताळ आणि वर्षअखेरचा आनंद पर्यंटनस्थळी जाऊन बिनधास्तपणे घेता येणार आहे. पुणे परिसरात गड किल्ले आहेत. त्या ठिकाणी पर्यटनासाठी चांगली गर्दी होऊ लागली आहे.पुणे आणि परिसरात पहाटे धुक्याची चादर असणार आहे. यामुळे या काळात सकाळी लवकरण उठून फिरणे आरोग्यासाठी चांगले असणार आहे.
हिवाळ्याच्या थंडीत फिरण्यासाठी अनेक जण जातात. त्यातच आता काही दिवसांत सुट्या सुरु होणार आहे. परंतु राज्यात आणि देशात वातावरणात बदल होत आहे. कधी कुठे पाऊस पडतो, कुठे गारपीट होते. नुकतीच काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस झाला. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. यामुळे पर्यटनासाठी जाण्यापूर्वी हवामान विभागाचा सल्ला घेणे आता गरजेचे झाले आहे. राज्यात आता पाऊस आहे का? या प्रश्नाचे उत्तर हवामान विभागाने दिले आहे. या उत्तरामुळे बिनधास्तपणे पर्यटनाचे नियोजन करा, असे म्हणावे लागणार आहे. थंडीच्या आनंदासोबत निसर्गरम्य ठिकाणांवर जात येणार आहेत.