पुणे : देशात मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. मात्र, जाता जाता परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील १० राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच महाराष्ट्रातही आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. राज्यात काही बऱ्याच ठिकाणी ऑक्टोबर हिट जाणवत आहे तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे संमिश्र वातावरण निर्माण झाल्याने कमालीचा उकाडा जाणवत आहे.
आजही महाराष्ट्रामध्ये अनेक भागात मुसळधार..
आजही महाराष्ट्रामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाला अनुकूल वातावर असल्यामुळे आज (ता. १६) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर वादळी वारे, विजांसह, पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच येलो अलर्ट जाहीर केला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, मावळात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्याची घाई सुरू झाली आहे. हाता तोंडाशी आलेलं पिकं वाया जाऊ नये यासाठी शेतकरी सोयाबीन काढणीकडे वळाला आहे. भाताच्या आगारात यंदा मावळ तालुक्यात सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. तसेच आज सकाळपासून पुण्यातही काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे.