पुणे : राज्यात परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात जोर धरला आहे. पुढील दोन दिवस काही जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम सुरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसानंतर उन्हाची तीव्रता वाढली आहे. विशेषकरुन मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. रात्री पाऊस आणि दिवसा घामाच्या धारामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
आज राज्यात काय परिस्थिती?
राज्यात आज अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर यादरम्यान राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरुपात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत आज पावसाची शक्यता..
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाचा तर ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘या’ दिवसापासून पाऊस ओसरणार..
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारी ‘दाना’ चक्रीवादळ तयार होणार आहे. गुरुवार हे चक्रीवादळ पुढे सरकणार आहे. शुक्रवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ गेलेले असेल. हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येणार नाही, असे हवामान विभागाने सांगितले.