पुणे : राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडी पसरल्यामुळे दिलासा मिळाला. तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. अशामध्ये पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याचा परिमाण इतर राज्यावरील हवामानावर होणार आहे. महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठे थंडी तर कुठे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानामध्ये सातत्याने घसरण होत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा १२.२ अंशापर्यंत घसरल्यामुळे थंडी चांगलीच वाढली आहे. राज्यातील किमान तापमानामध्ये घट होत आहे. तर दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.
‘या’ ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता..
राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता असून ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यामध्ये गुरूवार आणि शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.