पुणे : राज्यात पावसाने परतीचा प्रवास सुरु केला असं वाटत असतानाच अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे परतीचा पाऊस चांगलाच धुमाकूळ घालणार असे वाटत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच परतीच्या पावसाचा जोर ओसरल्यामुळे उन्हाचाही चटका जाणवू लागला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
राज्यात कमाल तापमानात वाढ झाली असून ‘ऑक्टोबर हीट’ जाणवू लागली आहे. तापमानाचा पारा ३६ अंशांच्याही पुढे गेला आहे. आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचं अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे, सातारा, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सध्या राज्यभरात पावसाने उसंत घेतल्याने उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार असून नागरिकांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे.