पुणे : सध्या देशातील बहुतांश भागात पावसाचा जोर आहे. तर काही भागात पावसाने आराम घेतला आहे. दरम्यान, यावर्षी देशभरात चांगला पाऊस झाला असून आता मान्सूनला परतीचे वेध लागले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा (मान्सून) परतीचा प्रवास 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत सुरु होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागात पावसाचा कहर बघायला मिळाला आहे. परंतु आता पुढील तीन ते चार दिवस पावसाची विश्रांती बघायला मिळणार आहे. त्यामुळं अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
15 ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा थांबा..
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजपासून महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. सध्या 15 ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा खंड पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावासाची शक्यता असून त्यानंतर 27 तारखेपासून पासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यंदा देशासह राज्यात चांगला पाऊस..
यावर्षी देशासह राज्यात चांगला पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. तसेच काही ठिकाणी राज्यातील धरणं ओव्हरफ्लो झालेली बघायला मिळत आहेत. त्यामुळं यंदा पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची सुद्धा चिंता मिटली आहे.