पुणे : मुंबईतील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक तापमान मागच्या २४ तासात जाणवलं. बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यातील थंडीने रजा घेतली आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत बुधवारी पहाटे काही भागात हलक्या सरी कोसळल्या.
तसेच कमाल तापमानाचा पारादेखील बुधवारी वाढलेला होता. कर्नाटकच्या जवळ पूर्व मध्य अरब सागरात कमी दाबात क्षेत्र कमकुवत होत असून दक्षिण पूर्व अरबी सागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. तर बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थितीही कमजोर होत आहे. याचे परिणाम हवामानावर झाले आहेत.
राज्यात 3 ते 5 अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान वाढ झाली आहे. महाराष्ट्रात मागच्या 48 तासात थंडीच्या मौसमातही सर्वात जास्त तापमान होतं. कडाक्याची थंडी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडेल असा अंदाज होता. मात्र अजून थोडी वाट प्रतीक्षा करावी लागणार आहे. १५ डिसेंबरनंतर पुन्हा राज्यात तापमानाचा पारा उतरण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीचा जोर वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे.
कोकणात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सोलापूर, सांगली, सातारा, लातूर आणि धाराशीव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 ते 40 किमी ताशी वेगानं वारे वाहतील, हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट दिला आहे. तर उद्या या जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी बरसणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात तापमान कोरडं, ढगाळ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.