पुणे : महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असला तरी राज्यातील काही भागात मात्र पावसाचा जोर बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहे. राज्यामध्ये 23 ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे आजही अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दि.२३ ऑक्टोबरपर्यंत (१७ ते २३ ऑक्टोबर) पावसाच्या दुसऱ्या आवर्तनात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे पावसाला पोषक हवामान असल्याने आज धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून दिला आहे. कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत. विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.