पुणे : गेले दोन दिवस झाले राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रस्ते जलमय झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज शुक्रवारी सुद्धा तुफान पाऊस होणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज (ता. २७) मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला देखील दिवसभर पाऊस झोडपून काढणार आहे. उद्यापासून पावसाचा जोर कमी होऊ शकतो, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.
सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियाणातून मॉन्सून परतला आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. परिणामी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
राज्यात ‘या’ भागात मुसळधार पाऊस..
कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि इतर परिसरात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह ७ जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळनार आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट..
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (ता. २७) पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगरसह, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.