पुणे : राज्यात सद्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे. दोन दिवस राज्यात धुके आणि ढगाळ हवामान कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच आज विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात वातावरण मात्र सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात अवकाळीचे सावट..
आज विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण राहणार असून थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास पारा घसरण्याची देखील शक्यता आहे. येणारे दोन दिवस अशाच पद्धतीचे वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या कमाल आणि किमान तापमानात कोणताही बदल होणार नसल्याची शक्यता आहे. पाच दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात आज पावसाची शक्यता आहे, पण येणाऱ्या दोन दिवस तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज आहे.
राज्यात थंडीचे पूनरागमन कधी?
बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रामधून सध्या थंडी गायब झाली आहे. रविवारपर्यंत महाराष्ट्रात फारशी थंडी जाणवणार नाही. रविवारनंतर महाराष्ट्रात हळूहळू थंडी परतण्याची शक्यता ववर्तवण्यात आली आहे. त्यापुढील तीन दिवस म्हणजे १९ ते २१ जानेवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी येण्याची परतण्याची शक्यता आहे.