पुणे : राज्यात सद्या पावसाने बहुतांश भागात सुट्टी घेतली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची संततधार सुरु आहे, तर काही ठिकाणी ऊन पडल्याचं दिसून येत आहे. 24 तासांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. हवामान विभागाकडून आज सुद्धा मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ-वारा..
येत्या २४ तासात राज्यात विविध भागात पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ भागात पावसाची शक्यता..
मुंबईत काही ठिकाणी हल्का पावसाची नोंद करण्यात आली आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाली आहे. पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.