पुणे : राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी झोडपून काढत आहेत. मुंबईसह कोकणात उन्हाचा ताप अधिक वाढला आहे. शुक्रवारी ठाणे येथे देशातील उच्चांकी ३५.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारपासून थंडीला सुरुवात होणार आहे. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवस राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सोमवारपासून पुन्हा एकदा थंडीला सुरूवात होऊ शकते. सध्या काही ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असून त्यामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
राज्यात थंडी परतणार का?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर सोमवारपासून ढगाळ वातावरण निवळून हळूहळू पुन्हा थंडीला सुरवात होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणकरांना थंडीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात पहाटे ५ वाजेचे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० ते १२ अंशांपर्यंतही घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.