पुणे : राज्यात तापमानाचा पारा वाढला असून नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. राज्यभरात तीव्र तापमानाचे अलर्ट देण्यात आले असून कमाल तापमानाचा पारा 35-38 अंशांपर्यंत राहणार असल्याचं सांगितलं जातं आहे. उन्हाचा त्रास झाल्याने सोमवारी सांगलीत उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. मुंबईत सोमवारी (24) सांताक्रूझ भागात दुपारी कमाल तापमान 38.40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात मुंबईसह कोकणपट्ट्यात सध्या प्रचंड उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या नोंदी होत आहेत. मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून समुद्री पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे दुपारी 1 नंतर कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यात हवामान कसे असेल?
राज्यात उकाडा जाणवू लागला असून तापमाचा पारा वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत कोकणातील बहुतांश भागात प्रचंड उष्णता वाढणार आहे. राज्यात पावसाची शक्यता नसून परिणामी उर्वरित ठिकाणी कोरडे व शुष्क हवामान असणार आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना आज (25) उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून हवामानाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. उद्याही उष्णतेची लाट कायम राहणार असून तापमान चढेच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
तापमानाची नोंद..
महाराष्ट्रात 24 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वाधिक तापमान शहादा (नंदुरबार) येथे 41.9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. यानंतर कराड (सातारा) येथे 40.6 अंश आणि पालघर येथे 40.2 अंश तापमानाची नोंद झाली असून पुण्यातील तळेगावमध्ये 38.3 अंश तर सोलापुरात 38.6 अंश तापमान होते. लोनावळा येथे 37.9 अंश तर मुंबई सांताक्रूझ येथे 37.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.