पुणे : पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला असून यामध्ये राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी मुंबईसह उपनगरात पावसाने थैमान घेतलं आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दरम्यान, आजही राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवार (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. मुंबईसह पुण्यातही जोरदार पाऊस होणार आहे. असं हवामान खात्याकडून सांगण्यात आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.
सध्या परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. परंतु, पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. सोमवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोला येथे ३६.१ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. तसेच, परभणी आणि अमरावतीमध्ये तापमान ३५ अंशाच्या पुढे गेलं आहे.
पुढील दोन दिवस राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. कारण, हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिला आहे. तर नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा..
मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील, असं आयएमडीने सांगितलं आहे.