पुणे : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार, सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. या दाबाला लागूनच जवळपास ७ किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. काल म्हणजेच शनिवारी (ता.७) ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
तर मात्र दुसरीकडे राज्यातील बहुतांश ठिकाणी सध्या तापमानाचा पारा ३० अंशाच्या वर गेला आहे. एकीकडे ऊन आणि सावल्यांचा हा खेळ सुरू असताना दुसरीकडे तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज वातावरणात पुन्हा बदल होऊन जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यात बरसणार पाऊस..
आज पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच कोकणासह नाशिक तसेच कोल्हापूरचा घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित विदर्भात शनिवारी दिवसभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव तसेच नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील आज पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आहे.