पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे कडाक्याची थंडी जाणवायला लागली होती. पण तामिळनाडू येथे आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा उलटफेर झाला आहे. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
ऐन हिवाळ्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. फंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री साडेसात वाजता तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले असून पदुचेरी आणि तामिळनाडूच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस कोसळला. या चक्रीवादळामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे तापमान वाढून थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दाट धूक्याची चादर पसरत असल्यामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा मक्का यासह द्राक्ष आणि मोसंबी यासारख्या फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बुरशीजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी महागडे औषधाची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.