नागपूर : मागील काही दिवसांपासून नागपुरात कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.१८) नागपुरात ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. शनिवारी यात १.७ अंशांची वाढ होऊन तापमानाने ४४.७अंश सेल्सिअसची मजल गाठली. नागपुरातील हे तापमान विदर्भ व महाराष्ट्रातील सर्वाधिक नव्हे तर मध्य भारतातील सर्वाधिक तापमान ठरले.
प्रादेशिक हवामान विभागाने नागपुरात शनिवारकरता पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला होता. यात ३० ते ४० तास प्रतिकिमी वेगाने वादळीवाऱ्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, नेहमीप्रमाणे हवामान अंदाजाला खोटे ठरवत शनिवारी नागपुरात तापमानात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. सोमवार, २१ एप्रिलला पुन्हा पावसाचा ‘यलो अलर्ट’ असला, तरी २० ते २५ एप्रिलपर्यंत नागपुरात तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
शनिवारी मध्य प्रदेशच्या शिवपुरी येथे सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस, तर छत्तीसगडच्या रायपूर येथे ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, विदर्भात नागपुरात सर्वाधिक ४४.७ अंश, मराठवाडा विभागात परभणी येथे सर्वाधिक ४३.६ अंश, मध्य महाराष्ट्रात मालेगाव येथे सर्वाधिक ४३ अंश, तर मुंबई-कोकण विभागात डहाणू येथे सर्वाधिक ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.