पुणे: महाराष्ट्र हवामान विभागाने राज्यभर तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे, काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यताही आहे. मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात कडक उन्हाचा अनुभवायला मिळणार आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाच्या अंदाजामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे.
दक्षिण उत्तर प्रदेश जवळच्या परिसरात समुद्र सपाटीपासून १.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भापासून तेलंगणा, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
अकोलामध्ये ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याने नागरिकांना उष्णतेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अमरावती, धुळे, जळगाव, यवतमाळ, सोलापूर, नागपूर येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात वादळ आणि पावसाची शक्यता देखील दर्शविली आहे, त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.