अजित जगताप
सातारा : खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात सध्या परदेशी रोहित (फ्लेमिंगो) पक्षांचे आज आगमन झाले त्यामुळे ग्रामस्थांसोबत हौशी पर्यटक सुखावले आहेत. यामुळे पक्षी पर्यटकांना आनंद झाला आहे. नाताळच्या सणाला परदेशी पक्षाचे दर्शनाने हौशी छायाचित्रकार प्रविण चव्हाण यांनी मोजक्याच रोहित पक्षाची छबी कॅमेरात टिपून त्याचे दर्शन सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
यंदा तालुक्यासह अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने येरळा धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे परदेशी पक्षी हजारो सागरी अंतर पार करून खटाव तालुक्यात आले आहेत. समुद्रपक्षी म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या रोहित पक्षी आकर्षक असून, याचा रंग पांढरा, गुलाबी किंवा लालसर असतो.
पायापासून उंची साधारणत: दीड मीटर आणि वजन साडेतीन किलोच्या आसपास असते. हे पक्षी पाणपक्षी असल्यामुळे अल्प प्रमाणात पाणी असणाऱ्या सरोवर किंवा तलावाच्या ठिकाणीच काही काळासाठी थांबतात. कारण त्यांच्या प्रजनन क्षेत्रात हवामान किंवा पातळीत होणाऱ्या बदलांमुळे हे पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करतात. हा रोहित पक्षी तलावातील सूक्ष्मजीव, लहान कीटक, अळ्या, निळे, हिरवे आणि लाल एकपेशीय वनस्पती, लहान मासे यांचे भक्षण करून जगतात. याच्या सहा प्रजाती असून, फ्लेमिंगो, चिलियन फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, ऑडियान, जेम्स आणि अमेरिकन किंवा करेबियन फ्लेमिंगो या नावाने ओळखल्या जातात.
आकाराने मोठे असून, त्याचा लांब गळा, काठीसारखे पाय आणि गुलाबी लालसर पंख हे होय. उत्तर महाराष्ट्रातील उजनी आणि जायकवाडी प्रकल्पातील जलाशयात मोठ्या प्रमाणात हे पक्षी आढळतात. या रोहित पक्षाच्या निरीक्षणातून अभ्यासकांना नवीन माहिती उपलब्ध करून घेण्यास मदत होते. तसेच हौशी व व्यवसायिक छायाचित्रकार यांच्यासाठी मोठी पर्वणी आहे, त्यामुळे येरळवाडी धरण अभ्यासाचे केंद्र बनले आहे, अशी माहिती छायाचित्रकार निनाद जगताप व ग्रामस्थ धनंजय चव्हाण यांनी दिली आहे.
रोहित पक्षाच्या आगमनाने येरळवाडी परिसरात पर्यटन विकास करण्यासाठी पर्वणी ठरली आहे. ग्रामस्थांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक खाद्य पदार्थ तसेच शीतपेय आणि शेती उत्पादनापासून तयार केलेले पदार्थ खाऊ घातल्यास काही काळासाठी निश्चित रोजगार उपलब्ध होईल असे वातावरण पाहण्यास मिळत आहे.