पुणे : राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असून, उन्हाचा चटका वाढू लागला आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहून कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा विरळ झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील आठवडाभर राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही भागात तुरळक सरी पडल्या आहेत. पाऊस व ढगाळ हवामान नाहीसे झाल्याने वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढू लागला आहे.
महाबळेश्वर वगळता राज्यातील सर्वच भागांचे तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. मंगळवारी सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे ३५.६ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उकाडा वाढू लागला आहे. महाबळेश्वर व सांताक्रुझ येथे मंगळवारी सायंकाळपर्यंत हलका पाऊस नोंदवला गेला आहे. तर राज्यात रात्रीच्या तापमानात फारशी वाढ झाली नाही. सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १७.६ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या १४ ते १९ ऑगस्टदरम्यान तुरळक भागात पावसाच्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.