पुणे : शहरात उन्हाचा चटका तीव्र होत असून, मंगळवारी (दि. २१) कमाल तापमानाचा पारा ४०.६ अंश सेल्सिअस इतका होता. दरम्यान, शहरात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. गेले काही दिवस शहरात विविध भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला आहे. तसेच कमाल तापमानात वाढ झाली आहे. शहरात त्यामुळे उन्हाबरोबर दमट हवामानही आहे. तसेच काही काळ ढगाळ हवामानही पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे घामाच्या पारा वाहू लागल्या असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारचे व्यवहार थंडावले आहेत.
त्यातच पुढील दोन-तीन दिवसांत पारा ४२ अंशांपर्यंत जाणार असल्याचा इशारा दिला आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली असून, ते २५.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. येत्या २२ मे रोजी आकाश दुपारनंतर अंशतः ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २३ ते २७ मे रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, उन्हाचा चटका वाढणार आहे. या दरम्यान कमाल तापमानचा पारा ३९ ते ४२ अंश सेल्सिअस राहणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.