पुणे : राज्यातील बहुतांश भागांत किमान आणि कमाल तापमानात घट झाली. काही भागात दुपारी उन्हाचा चटका कायम असून रात्री गारठा जाणवू लागला आहे. सोमवारी सर्वात कमी तापमान जळगाव येथे १६.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, राज्यात हवामान कोरडे राहणार असून तापमानात घट होणार आहे.
उत्तर भारतात थंडीची चाहूल लागली आहे. थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागले आहेत. तसेच सूर्याचे दक्षिणायन सुरू झाले आहे. राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे राज्यातून पाऊस गायब झाला आहे. मागील चार दिवस पावसाची नोंद झाली नाही. राज्यातील अनेक भागांत किमान आणि कमाल तापमानात घट झाली. मात्र काही भागांत दुपारी उन्हाचा चटका कायम दिसतो. तर सकाळी हवेत गारठा जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक शहरांचे तापमान उतरले आहे. राज्यात सोमवारी सर्वात जास्त तापमान अलिबाग येथे ३५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.