पुणे : राज्यात जुलैच्या सुरुवातीला कोसळलेल्या दमदार पावसामुळे जून महिन्याची तूट भरून निघाली होती. यामुळे शेतकरी सुखावला असतानाच आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मान्सूनचा वेग मंदावला असून पुढील 10 ते 15 दिवस पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे अनेक भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला असून, कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आज (12 जुलै) देखील राज्यात उष्णता आणि उकाडा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जरी राज्यात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी 13 जुलैपासून विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह घाटमाथ्यावर केवळ हलक्या सरी बरसतील.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागात हलका पाऊस होऊ शकतो, तर सांगली आणि सोलापूरमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. दुसरीकडे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप असणार आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, जुलै महिन्याच्या अखेरीस मान्सून पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात सक्रिय होईल आणि दमदार पावसाचे पुनरागमन होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या कोरड्या हवामानाचा सामना करावा लागणार आहे.







