पुणे : राज्यात काही ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढले आहे. खास करून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत आहे. पण उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा घसरलाय, तर मुंबई आणि कोकणात मात्र किमान आणि कमाल तापमान कोणतीही घट दिसत नाही. मुंबई आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवस राज्यात समिश्र वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, नोव्हेंबर अखेरीस राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सध्या कडाक्याची थंडी वाढत आहे. निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोकण आणि मुंबई वगळता इतर ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात घट बघायला मिळत आहे. पण दक्षिण महाराष्ट्राकडील जिल्ह्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
‘या’ जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा..
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची चाहूल लागल्याचे चित्र आहे. पहाटे हवेत थोडाफार गारठा जाणवू लागला आहे. गुरुवारी निफाड ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी किमान तापमान १५ अंशावर आल्याची नोंद झाली.
कोकण आणि मुंबईमध्ये कमाल आणि किमान तापमानात चढ उतार बघायला मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबईमध्ये झाली आहे. गुरुवारी सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई आणि उपनगरात मागील दोन तीन दिवसांपासून थंडीची चाहूल लागली होती, पण पुढील तीन दिवस तापमानात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.