पुणे : यंदाच्या पावसाळी हंगामानंतर आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या म्हणजेच मॉन्सूनच्या परतीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवार, 19 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून मॉन्सूनच्या माघारीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पावसाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

मॉन्सूनची माघार जाहीर करण्यासाठी काही महत्त्वाच्या हवामानविषयक परिस्थिती निर्माण होणे आवश्यक असते. वायव्य भारतात सलग पाच दिवस पावसाने विश्रांती घेणे, वातावरणातील आर्द्रता कमी होऊन कोरडे हवामान तयार होणे आणि वाऱ्यांच्या दिशेत बदल होणे, या बाबी त्यात महत्त्वाच्या आहेत. याशिवाय परिसरात प्रतिचक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यानंतरच मॉन्सून परतल्याचे अधिकृतपणे जाहीर केले जाते.

यंदा मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन नेहमीपेक्षा काहीसे उशिराने झाले. 4 जून रोजी केरळसह कर्नाटकच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर 6 जूनला त्याने तळ कोकणात प्रवेश केला. मात्र पुढील वाटचालीत काही अडथळे निर्माण झाल्याने मॉन्सूनचा वेग काही काळ मंदावला.

दरम्यान, 29 जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर देशातील उर्वरित भागातही त्याची वाटचाल सुरू राहिली. अखेर 9 जुलै रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा हवामान विभागाने केली होती.
यंदा मॉन्सून देशभर पोहोचण्यास एक दिवस उशीर झाला होता. आता त्याची माघारही दीर्घकालीन सरासरी वेळेपेक्षा सुमारे दोन दिवस उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत हवामानातील बदलांवर लक्ष ठेवले जाणार असून, त्यानुसार मॉन्सूनच्या परतीबाबत अधिकृत माहिती दिली जाईल.







