उरुळी कांचन : माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना शिंदवणे (ता. हवेली) येथील शितोळे मळा परिसरात गुरुवारी (ता.10) घडली आहे. विवाहितेला मारहाण होत असताना तिला घेण्यासाठी आलेल्या भावालाही विटेने डोक्यात व पाठीवर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका 18 वर्षीय विवाहितेने उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पती तुषार नाना शितोळे, सासरे नाना पांडुरंग शितोळे, सासू मनिषा नाना शितोळे, नणंद कोमल मोहन घोलप व नंदावा मोहन घोलप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मार्च 2026 मध्ये तुषार यांच्यासोबत घरातून पळून जाऊन विवाह केला होता. त्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाहविधी करण्यात आले. यावेळी पतीने फिर्यादी यांच्या वडिलांकडून तीन लाख रुपये हुंडा घेतल्याचा आरोप आहे. सुरुवातीला काही काळ व्यवस्थित नांदवल्यानंतर माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून तिचा छळ सुरू झाला.

दरम्यान, फिर्यादी यांना त्यांच्या पतीने माहेरून पैसे आणण्यास सांगून 10 सप्टेंबर रोजी पुन्हा मारहाण केली. त्यानंतर सायंकाळी पती, सासू व सासऱ्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत फिर्यादी यांना मारहाण व शिवीगाळ केली. यावेळी सासू मनिषा नाना शितोळे यांनी फिर्यादी यांच्या भावाला घरी बोलावून घेतले. भाऊ सुहास पवार याने बहिणीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता पती तुषार याने त्याला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच विटेने सुहास यांच्या डोक्यात व पाठीवर मारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम कलम 85,118 (1), 115(2), 352,351(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार होले करीत आहेत.






