लोणी काळभोर: लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रामदरा रोडवरील कोळपे वस्तीच्या टेकडीवर मोकळ्या मैदानात विनापरवाना देशी दारूची विक्रीचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाळा यश आले आहे. पोलिसांनी छापा टाकून 65 वर्षीय इसमाला शनिवारी (ता.12) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 94 टँगो पंच देशी दारूच्या बाटल्या आणि 120 रुपये रोख, असा एकूण 3 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बादशहा नाथु रजपुत (वय 65, रा. रामदरा रोड, कोळपे वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अक्षय राजेंद्र बांदल (वय 35) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुन्हे शाखा युनिट-6 चे पथक 12 सप्टेंबर रोजी लोणी काळभोर परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात गस्त घालत होते.

गस्त घालत असताना पोलिसांना रामदरा रोड, कोळपे वस्ती येथील टेकडीवर एक व्यक्ती 90 मिलीच्या टँगो पंच देशी दारूच्या बाटल्या विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री सुमारे पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता रजपुत हा दारू विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडील 94 बाटल्या प्रत्येकी 40 रुपये किमतीच्या, तसेच दारू विक्रीतून मिळालेले 120 रुपये रोख जप्त केले. यातील एका बाटलीचा नमुना रासायनिक तपासणीसाठी स्वतंत्रपणे सीलबंद करण्यात आला असून उर्वरित दारूही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी रजपुत याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







